
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर एन चंद्रशेखरन यांची घोषणा:एअर इंडियाच्या सर्व वाइडबॉडी विमानांसाठी नव्या सुरक्षा उपाययोजना त्वरित लागू
१२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पहिल्या सार्वजनिक प्रतिक्रियेत दुःख व्यक्त करत, पीडितांच्या कुटुंबीयांसोबत टाटा समूह नेहमीच उभा राहील असे ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या सर्व वाइडबॉडी विमानांसाठी नव्या सुरक्षाविषयक उपाययोजना त्वरित लागू केल्याचेही जाहीर केले. चंद्रशेखरन यांनी हेही अधोरेखित केले की, ज्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरमध्ये ही दुर्दैवी दुर्घटना घडली, ते विमान अत्यंत चांगल्या देखभालीखाली होते आणि ते चालवणारे वैमानिक हे कंपनीच्या अत्यंत अनुभवी आणि विश्वासार्ह वैमानिकांपैकी एक होते. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “अपघातग्रस्त विमानाचा इतिहास संपूर्णपणे स्वच्छ होता.” त्यांनी माहिती दिली की या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरची शेवटची सखोल तपासणी जून २०२३ मध्ये झाली होती, तर पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये नियोजित होती. इंजिन तपासण्याबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की उजवे इंजिन मार्च २०२५ मध्ये आणि डावे इंजिन एप्रिल २०२५ मध्ये तपासले गेले होते. “उड्डाणापूर्वी कोणतीही समस्या निदर्शनास आली नव्हती आणि सर्व प्रणाली नियमितपणे तपासल्या जात होत्या,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. डीजीसीएने आमच्या बोईंग ७८७ ताफ्याच्या देखभालीच्या प्रक्रियेची तपासणी करून ती सर्व सुरक्षा निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केले असल्याचे श्री. चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले अपघातस्थळावरून दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळवण्यात आले आहेत आणि सध्या एका बहुराष्ट्रीय तपास पथकाकडून माहितीचे विश्लेषण सुरू आहे. या पथकात भारताच्या विमान अपघात तपास संस्था (AAIB), अमेरिकेचे राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ (NTSB), बोईंग, GE एअरोस्पेस, आणि यूकेच्या एअर अॅक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रँच (AAIB-UK) या संस्थांचे तज्ज्ञ सहभागी आहेत. "आपण सर्वजण, संपूर्ण विमान वाहतूक उद्योगासह, अपघाताच्या कारणांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा करत आहोत," असे श्री. चंद्रशेखरन यांनी सांगितले. त्यांनी अपघाताच्या कारणांबाबत पूर्वअंदाज लावण्याविषयी सावधगिरी बाळगण्याचेही आवाहन केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर टाटा समूहाने व्यापक प्रतिसाद दिला आहे. समूहाने प्रत्येक पीडित कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली असून, जखमींच्या सर्व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेतली आहे. तसेच, अपघातात उध्वस्त झालेल्या वैद्यकीय वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, ‘AI171 ट्रस्ट’ स्थापन करण्याची योजना आखली जात आहे, जी या दुर्घटनेने प्रभावित कुटुंबांना दीर्घकालीन आधार देईल. ही दुर्घटना अतिशय हृदयद्रावक असून टाटा समूहाच्या हवाई सेवा क्षेत्रात अशी घटना घडल्याबद्दल त्यांनी व्यक्तिशः खंत व्यक्त करत या घटनेने मला अत्यंत दुःख झाल्याचे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. "या कठीण प्रसंगी आमचा सर्वतोपरी पाठिंबा प्रभावित कुटुंबांना असेल, आणि मी स्वतः त्यांच्या सोबत उभा राहीन," असे त्यांनी ठामपणे सांगितले. एअर इंडिया ही विमानसेवा 2022 मध्ये सरकारकडून टाटा सन्सकडे परत येण्याची प्रक्रिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, त्या श्री. एन. चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या मूल्यांचा आणि परंपरेचा विशेष उल्लेख केला.
"मी टाटा समूहातूनच घडलेलो आहे. समूहाने दिलेली मूल्यं आणि संस्कारच माझ्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहेत. मी ना जे.आर.डी. टाटा आहे, ना रतन नवल टाटा. पण आम्ही सर्वजण त्यांच्या मूल्यांवर चालणारे आहोत आणि हीच आमची प्रेरणा आहे की, आमच्या वर्तनातून, प्रयत्नांतून आणि चिकाटीतून अशी कामगिरी करावी, जी प्रत्येकाला अभिमान वाटेल," असे त्यांनी नम्रतेने सांगितले. AI171 अपघात आणि त्यानंतरच्या घटनांनी टाटा मालकीतील एअर इंडियाच्या चालू रूपांतरण प्रक्रियेस मोठे आव्हान उभे केले आहे. ही दुर्घटना त्या काळात घडली जेव्हा एअर इंडिया स्वतःला जागतिक प्रीमियम विमानसेवा म्हणून पुन्हा उभारण्यासाठी महत्त्वाकांक्षी आधुनिकीकरण आणि विस्तार धोरण राबवत होती. ताफ्यातील सर्व विमानांची सुरक्षा तपासणी आणि परिचालनातील तात्पुरते व्यत्यय निर्माण झाल्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही टाटा समूहाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला व्यावसायिक हितांपेक्षा प्राधान्य देणे स्पष्टपणे दाखवले आहे, जे त्यांच्या संपूर्ण प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून येते.