
कराड हॉस्पिटलचे उद्घाटन:गरिबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, नितीन गडकरींनी दिली माहिती
देशातील सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सेवा परमोधर्म असून समाजातील शेवटच्या मानवापर्यंत ती पोहचवावी. सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेची सेवा करावी. या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शुन्यतेची सर्वात मोठी समस्या आहे ”असे विचार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)चे उद्घाटन फीता कापून केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड हे असतील. तसेच, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, हभप तुळशीराम कराड आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले,भविष्यातील व्हिजन अत्यंत महत्वाचे असून यामध्ये सरकारच्या भूमिकेबरोबरच समाजाने आता समाजासाठी कार्य करावे. स्वामी विवेकानंद म्हणायचे अंर्तआत्म्याच्या शोध घेतला की देव शोधायला कुठेही जावे लागत नाही. खरा धर्म हा मानवतेचा आहे. आईच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परिवारावर झालेले संस्कार कळतात यामुळे गरीब व सामान्य जनतेची सेवा घडेल. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने गरीबांसाठी ५ लाख रुपयांपर्यताच्या उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक संवेदनशीलता आणि जाणिव ठेऊन नागपूर येथे गरिबांसाठी सर्व वैद्यकीय सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे त्यांचा आशिर्वाद लाभत आहे. आता १ हजार घरांचे स्मार्ट गांव बनविण्यात येत आहे. ५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध घरांमध्ये पाणी आणि विज मोफत मिळणार आहे.