
त्रिभाषा सुत्रासंदर्भात वर्षावर आढावा बैठक:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले - त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल
त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने 17 जून रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करत शालेय शिक्षणात तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर राज्यभरातून या धोरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारला आव्हान दिले. तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. सरकारने हे आमचे आव्हान समजावे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. केवळ मनसेच नव्हे तर मराठी अभ्यास केंद्राकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आक्षेप नोंदवण्यात आला आहे. समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय एकीकडे शासनाच्या या निर्णयाला विरोध वाढत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीने बोलवून वर्षा निवासस्थानावर बैठक घेतली. बैठकीत या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सल्लामसलतीची प्रक्रिया झाल्यावरच निर्णय मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते. हे ही वाचा... विधानसभेत षंढ लोक बसलेत:विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका; हक्कभंग दाखल होणार? विधानभवनात षंढ लोक बसल्याची जळजळीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी भाषेचा बोर्ड नसल्याच्या मुद्यावर भाष्य करताना त्यांनी हे विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदारा संजय राऊत यांनीही काही महिन्यांपूर्वी असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. आता तसेच विधान करणाऱ्या संदीप देशपांडे यांच्यावरही हक्कभंग दाखल होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूर्ण बातमी वाचा...