
पुण्यात शास्त्रीय संगीताचा दरवळला सुगंध:पं. आनंद भाटे आणि अमर ओक यांच्या 'मृदगंध' मैफलीत रसिकांची मनोहारी मेजवानी
पावसाच्या सरींनी आल्हाददायक झालेल्या चिंब वातावरणात संगीताच्या वैविध्यपूर्ण प्रकारांचा आस्वाद घेत पुणेकरांनी स्वर आणि सुरांचा अतुलनीय 'मृदगंध' अनुभवला. निमित्त होते विद्या हॉस्पिटॅलिटी, सुदित डेव्हलपर्स आणि रुई युनिव्हर्सल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे आणि प्रसिध्द बासरीवादक अमर ओक यांच्या 'मृदगंध' या मैफिलीचे. यावेळी विद्या हॉस्पिटॅलिटीचे गौरव भिडे, सुदित डेव्हलपर्सचे सुदित तावरे आणि रुई यूनिवर्सलचे नकुल देशपांडे यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. या मैफलीत प्रारंभी आनंद भाटे यांनी एकल शास्त्रीय गायन, तर अमर ओक यांनी एकल बासरी वादन सादर केले. शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावसंगीत, भक्तिसंगीत आणि सिने संगीत अशा वैविध्यपूर्ण गायन-वादनाने ही मैफल रंगत गेली. पहाडी आणि सिंध भैरवी रागावर आधारित ठुमरीने मैफलीचा कळस गाठला. राग मेघ आणि वृंदावनी सारंग यांचा सुंदर कोलाज अनुभवताना रसिकांना निसर्गाशी असलेल्या अद्वैताची अनुभूती आली. शास्त्रीय गायन आणि बासरी वादनाच्या जुगलबंदीचे साक्षीदार होत रसिकांनी मनोरंजनी रागाचा देखील आनंद घेतला. मैफलीच्या उत्तरार्धात आनंद भाटे यांनी नाट्यगीते सादर केली. 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकातील 'प्रिये पहा...' यासह अनेक अजरामर नाट्यगीतांनी वाहवा मिळवली. विठुमाऊलीच्या ओढीने संतांच्या लेखणीतून पाझरलेल्या अभंग-वाणीने अवघे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. श्रीरामाच्या आरतीत तल्लीन झालेल्या रसिकांबरोबर विठूचा गजर करीत मैफलीचा समारोप झाला. या मैफलीत प्रसाद जोशी (पखवाज आणि तबला), पांडुरंग पवार (तबला), अमृता ठाकुरदेसाई (कीबोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) या वादक कलाकारांनी सुरेल साथसंगत केली. या मैफलीचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.