नेपाळमध्ये जेन-झीकडून नवीन पक्षाची स्थापना:पुढील वर्षी निवडणूक लढवण्याचीही तयारी
Category: International |
19 Oct 2025
नेपाळची नवीन पिढी, जेन-झी आता राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. शनिवारी, या गटाने पत्रकार परिषद घेऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग काही “किमान अटी” पूर्ण करण्यावर अवलंबून असेल. ५ मार्च २०२६ रोजी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जेन-झी गटाने गेल्या महिन्यात भ्रष्टाचार आणि सरकारच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. या चळवळीमुळे केपी शर्मा ओली सरकारचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. चळवळीचे नेते मिराज ढुंगाना यांनी शनिवारी नवीन पक्षाचा अजेंडा सादर केला. ढुंगाना म्हणाले, “चळवळीशी संबंधित तरुणांना एकत्र करण्यासाठी पक्षाची स्थापना आवश्यक आहे.” आमच्या २ मागण्या आहेत: देशात थेट निवडून आलेली कार्यकारी व्यवस्था लागू करावी व परदेशात राहणाऱ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार द्यावा. या अटी मान्य होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही.
Source: DivyaMarathi