सातारा-लातूर महामार्गावर दुचाकी-कारचा अपघात:दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक गंभीर
Category: Maharashtra |
23 Nov 2025
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गा दरम्यान मुगाव फाट्याजवळ (ता. कोरेगाव) स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागेवर ठार झाला, तर पाठीमागच्या सीटवर बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैष्णव शंकर काटकर (वय २५ रा. ललगुण ता. खटाव) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गादरम्यान मुगाव फाट्याच्या पुढे सातारा बाजूकडे एका काळ्या रंगाच्या हिरो होंडा मोटरसायकलवरून (क्र.एम. एच. ११- बी.सी. ४४५०) वैष्णव शंकर काटकर (वय २५, रा. ललगूण, ता. खटाव) व गौरव सुनिल यादव (वय २१, रा. शिरंबे, ता. कोरेगाव) हे दोघे कोरेगाव बाजूकडून साताऱ्याकडे निघाले होते, तर साताऱ्याकडून स्विफ्ट कार (क्र.एम. एच.०२ सी. पी.८७९०) येत असताना या दोन्ही वाहनांत झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार वैष्णव काटकर हा जागीच ठार झाला, तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला गौरव यादव हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे समजले. अपघातस्थळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत होते, दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत होते. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.
Source: DivyaMarathi