
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचे नाव द्या:मेधा कुलकर्णी यांची मागणी, म्हणाल्या - तेथे शहराचा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे
भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, असे त्या म्हणाल्यात. तसेच पुणे रेल्वे स्थानकात शहराचा इतिहास कुठेच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या ही मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मेधा कुलकर्णी या काही दिवसांपूर्वी फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून चर्चेत आल्या होत्या. अनेक ठेवीदारांच्या नावावर खोट्या कर्जांची नोंद करून, त्यांना फसवण्यात आले आहे. काहींच्या 20 ते 25 वर्षांहूनही जास्त जुन्या ठेवी आहेत, पण पैसे मिळवण्यासाठी त्यांना चकरा माराव्या लागत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी आता पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी पुढे करून पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. नेमके काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आहे आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अटकपर्यंत मराठा साम्राज्य नेले. याचे प्रतिक हे शनिवारवाडा आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या. पुणे रेल्वे स्थानकाची डागडुजी करणे फार महत्त्वाचे आहे. पुणे स्थानकाच्या आवारात या शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत, या स्थानकाची डागडुजी करताना हा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. सगळ्या देशातील वेगवेगेळी रेल्वे स्थानके, विमानतळे या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा. हीच मागणी मी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्यायला हवे, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. पुणे शहर ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र दरम्यान, पुणे शहर हे आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जाते. मराठा साम्राज्याच्या राजकारणापासून ते समाजसुधारणेच्या चळवळींपर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडींचे पुणे हे केंद्र राहिले आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या मागणमुळे आता पुण्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यामुले आता या मागणीनंतर काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.