News Image

महाराष्ट्रातील 90% साहित्यिक लाचार:हिंदी सक्तीवरून संजय राऊत संतापले; पाटेकर, दामले, माधुरी दीक्षित यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस मराठी साहित्यिक यांच्या सोबत घेत असलेल्या बैठकांवर देखील राऊत यांनी टीका केली. महाराष्ट्रातील 90% साहित्यिक हे लाचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेवर अन्याय होत असताना, अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले आणि माधुरी दीक्षित हे गप्प का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे. तर दुसरीकडे हिंदी भाषिक उत्तर प्रदेश मध्ये 5000 हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयी महाराष्ट्रातील साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. साहित्यिकांना मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असती तर हिंदी भाषेचा दबाव सुरू आहे, हिंदी लादली जात आहे. त्याच्यावर साहित्यिक बोलले असते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त 90% साहित्यिक हे लाचार अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित कुठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मराठी जनतेने तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मात्र मराठीवर हल्ले होत असताना तुम्ही गप्प का आहात? असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. राज्यातील लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त 90% साहित्यिक हे लाचार असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवण्यासाठी शिक्षक नाही देवेंद्र फडणवीस यांचा हिंदीसाठी महाराष्ट्रात आटापिटा सुरू आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश मध्ये 5000 हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या आहेत. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. ही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती आहे. शिक्षकांशिवाय शाळा भरवल्या जात आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ही सर्व माहिती रेकॉर्डवर आहे. उत्तर प्रदेशमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर हे छापून येत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हिंदी भाषिक इतर राज्यांमध्ये देखील हिंदी शाळा बंद पडत आहेत. त्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काम करायला हवे, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला. साहित्यिकांशी बैठका म्हणजे मराठीचा अपमान माझी मुले मराठी शाळांमध्ये शिकली आहेत. त्यामुळे हे आम्ही हक्काने सांगू शकतो. तुमची मुले कोणत्या शाळेत शिकतात? ते मराठी शाळेत शिकले का? असा प्रश्न राऊत यांनी साहित्यिकांना विचारला. ज्या साहित्यिकांशी देवेंद्र फडणवीस चर्चा करत आहेत, त्यांची मुले आणि नातवंड हिंदी शाळेत शिकत आहेत किंवा परदेशात शिकत आहेत. ज्या बैठका घेतल्या जात आहेत, त्या मराठीचा अपमान करणाऱ्या असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मराठीवर आक्रमण करण्यासंदर्भात बैठका कोणाशी आणि का घेत आहात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.