News Image

उशिराचे शहाणपण:राज्यभरातून टीकेनंतर अबू आझमींनी मागितली माफी; म्हणाले- 'देशाच्या एकतेला कधीही बाधा येऊ देणार नाही'


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारी बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. यामुळे वारकरी देखील संतप्त झाले होते. यानंतर आता अबू आझमी यांनी माफी मागत दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. कोणालाही दुखावण्याची माझी भावना नव्हती. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच माफी मागत असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. या संदर्भात आमदार अबू आझमी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. तसेच माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधण्याचा होता. त्यांच्या दुटप्पीपणा मुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की, या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अबू आझमी यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... सोलापूरमध्ये मी नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीवरून पसरलेल्या गैरसमजुती मी स्पष्ट करू इच्छितो. माझे विधान विकृत आणि द्वेषपूर्ण पद्धतीने सादर केले गेले. जर त्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. मी एक समर्पित समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या सर्वव्यापी, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधण्याचा होता की त्यांच्या दुटप्पीपणा मुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत - तर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात की सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा येऊ देणार नाही. नेमके काय म्हणाले होते अबू आझमी? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते, असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.