News Image

अजित पवारांचा उद्धव ठाकरे यांना झटका:महादेव बाबर राष्ट्रवादीत करणार प्रवेश; आपण पूर्वीपासून दादांचा चाहता असल्याचा केला दावा


शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. ते दस्तुरखुद्द अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बाबर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुण्यात जोरदार झटका बसला आहे. महादेव बाबर हे ठाकरे गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. सुरूवातीला बाबर कोणत्या पक्षात जाणार? याविषयी अनेक अटकळी व्यक्त केल्या जात होत्या. पण आज अखेर त्यांनी स्वतःच आपण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले. ते आज अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्ष प्रवेशामु्ळे राष्ट्रवादीतील पुण्यातील ताकद वाढणार आहे. मी पूर्वीपासूनच अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा चाहता आहे. त्यातच सध्या त्यांची सत्ताही आहे. त्यामुळे विकासाचे मार्ग मोकळे आहेत. त्यामुळे मी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या परिसराचा विकास हाच माझा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मी चांगले काम करून दाखवेल, असे महादेव बाबर आपल्या पक्षप्रवेशाविषयी बोलताना म्हणाले. सांगलीच्या मिरजेतही ठाकरे गटाला झटका दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे मिरजचे शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी मिरजेत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला. मैंगुरे यांची ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ठाकरे गटाला मिरजेत मोठे खिंडार पडले आहे. रावसाहेब पाटील भाजपत जाणार उल्लेखनीय बाब म्हणजे सांगली येथीलच जैन समाजाचे नेते तथा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे सुद्धा आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. रावसाहेब पाटील हे जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आहेत. सांगली जिल्ह्यातील समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यासह शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये रावसाहेब पाटील यांचे मोठे कार्य आहे. ऑक्टोबरमध्ये स्थानिकचा धुमधडाका पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. या निवडणुका 4 टप्प्यांत होणार आहेत. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मतदानाला सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पक्षांतरात मोठी वाढ झाली आहे.