News Image

कथित सामाजिक कार्यकर्त्याला खंडणी घेताना अटक:औषधी उपकरणे पुरवणाऱ्याकडून 15 लाखांची खंडणी उकळताना बेड्या


कोल्हापुरातील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याला तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हा कार्यकर्ता पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी म्हणून राजकारणात सक्रिय होता. पण त्याच्या काळ्या कारनाम्यांची माहिती मिळताच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, जयराज कोळी असे अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर एका औषधी उपकरकणांच्या पुरवठादाराकडून 15 लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कागल पोलिसांनी मंगळवारी सकाळी एक संयुक्त कारवाई करत जयराज गोळी व त्याचा सहकारी युवराज खराडे यांना अटक केली. कोळीने फिर्यादीला खंडणी द्या, अन्यथा तुमच्या पत्नीच्या नावाने खोटे चौकशीचे अर्ज टाकून त्रास देण्याची धमकी दिली होती. नेमके काय आहे प्रकरण? पोलिसांच्या माहितीनुसार, जयराज कोळी एका औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता. 20 लाख रुपये दे त्यानंतर मी सर्व अर्ज मागे घेतो अशी मागणी त्याने केली होती. फिर्यादी व आरोपी यांच्यात अखेर 15 लाखांवर तडजोड झाली होती. कागलच्या लक्ष्मी टेकडी लगत हे पैसे देण्याचे ठरले होते. पण तत्पूर्वीच फिर्यादीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचून जयराज कोळी व युवराज खराडे या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांवरही कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जयराज कोळी याने सामाजिक कार्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर रुग्णालयासह विविध ठिकाणी माहिती अधिकाराचे अर्ज (आरटीआय) टाकून संबंधित व्यक्तींकडे तो पैशांची मागणी करत होता. त्याचे अशा पद्धतीचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता. पण त्याचे हे कारनामे पाहूनच त्याची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा केला जातो. कोळीविरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी आरोपींनी या पूर्वी एखाद्या व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा धंदा केला होता काय? याचा तपास करत आहेत.