News Image

अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज:पक्षाच्या बैठकीमध्ये देखील बोलवले जात नसल्याची खंत


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर्गत या नाराजी मुळे पक्षात असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत. ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांवर अजित पवार यांची पकड मानले जाते, त्या पुण्यातीलच अनेक बडे नेते हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पक्षातील काही माजी आमदारांचा देखील समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे देवेंद्र भुयार, जुन्नरचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. पक्षातील कोणत्याच बैठकीला आपल्याला बोलावले जात नाही. तसेच पक्षात कोणतीही मोठी जबाबदारी अद्याप पक्षाने दिलेली नसल्याची खंत या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षात नवीन येणाऱ्या लोकांचा मानसन्मान केला जातोय. मात्र, पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना योग्य वागणूक दिली जात नाही, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये देखील बोलवले जात नसल्याची खंत पक्ष आणि अडचणीच्या काळात आम्ही पक्षाच्या सोबत होतो. मात्र नवीन येणाऱ्या माजी आमदारांना सन्मानाची वागणूक दिली जात आहे. तर दुसरीकडे सोबत असणाऱ्या माजी आमदारांना पक्षाच्या बैठकीमध्ये देखील बोलवले जात नसल्याची खंत या माजी आमदार आणि नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अजित पवार या सर्व नाराज नेत्यांची समजूत कशा पद्धतीने काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता? आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मधील नाराज आणि पराभूत झालेल्या नेत्यांची सध्या महायुतीतील तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून महायुती अधिक मजबूत करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र यामुळे सध्या पक्षात असलेले इतर नेते नाराज होत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले अनेक माजी आमदार किंवा उमेदवार हे महायुतीमधील घटक पक्षात समावेश होत आहे. मात्र पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता? असा सवाल अजित पवार यांच्या एका गटाकडून विचारला जात आहे. अजित पवार यांच्याशी संबंधीत खालील बातमी देखील वाचा... माळेगाव कारखाना:अजित पवारांच्या पॅनलची विजयाकडे वाटचाल; 21 पैकी 14 जागांवर अजित पवारांचे उमेदवार पुढे बारामती परिसरातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनल बाजी मारण्याच्या तयारीत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. स्वत: अजित पवारांनी ब गटातून विजय मिळवला आहे, तर 21 पैकी जवळपास 14 जागांवर त्यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत. पूर्ण बातमी वाचा...