
'संविधान हत्या दिवसा'ला संजय राऊत यांचा विरोध:इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे केले समर्थन, देशात अघोषित आणीबाणीचा असल्याचा आरोप
भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 'संविधान हत्या दिवस' पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन देखील केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आपत्काळ किंवा आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा होऊ शकतो? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. संघाचे संस्थापक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांना इंदिरा गांधी यांना अटक केली होती. मात्र, तुरुंगातून त्यांनी जो पत्र व्यवहार केला होता, तो एकदा पहा, असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे. त्यात देवरस यांनी देखील आणीबाणीला समर्थन दिले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर पणे आणीबाणीचे समर्थन केले होते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीर पणे आणीबाणीचे समर्थन केले होते. त्यांनी खुले समर्थन दिले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक आणीबाणीत आमच्या मार्मिक साप्ताहिकावर धाडी पडून तेव्हा प्रेस बंद केली होती. तरी देखील आम्ही त्यांना समर्थन दिलं होते. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार देशांमध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशा वेळी अशांतता निर्माण करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती काम करतात. तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधान मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने दिलेली आहे. याचा अभ्यास देखील या लोकांनी करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. गेल्या दहा वर्षात या देशात अघोषित आणीबाणी इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी कायदेशीर मार्गाने लावली होती. तसेच आणीबाणीच्या प्रस्ताव मांडण्यासाठी त्या संसदेत गेल्या होत्या. त्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र, गेल्या दहा वर्षात या देशात अघोषित आणीबाणी आहे. प्रचंड भ्रष्टाचार आणि काळाबाजार सुरू आहे. लाडक्या उद्योजकांवर सरकारी संपत्ती लुटली जाते आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकले जात आहे. आजही तिहार आणि महाराष्ट्रातील तुरुंगात अनेक लोक अडकून आहेत. कोणालाही तुम्ही देशद्रोही आणि नक्षलवादी ठरवत आहात. इंदिरा गांधींनी ते केले नव्हते, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 'संविधान हत्या दिवस' पाळण्याचे ढोंग एका विशिष्ट काल मर्यादेमध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी हटवली आणि देशात लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या होत्या. त्या निवडणुकीत त्यांचा पक्ष आणि त्या स्वतः पराभूत झाल्या. मात्र, त्यांनी त्याचे खापर कोणावर फोडले नाही. त्यावेळेस अधिकृत आणीबाणी होती तर आता अघोषित आणीबाणी आहे. गेल्या दहा वर्षात ती लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने 'संविधान हत्या दिवस' पाळण्याचे ढोंग करू नये. वास्तविक आता गेल्या दहा वर्षात जी अघोषित आणीबाणी आहे, त्या विषयी जागृत करणारे महत्त्वाचा आहे. तेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करायला हवे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.