News Image

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन:23 जून रोजीच झाली होती जमीन अर्जावर सुनावणी, 66 दिवसांनी अटकेतून बाहेर


कोल्हापूर येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत मनीषा मुसळेला अटक करण्यात आली होती. आता जवळपास 66 दिवसांनी तिला जामीन मिळाला आहे. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मनीषा मुसळेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 23 जून रोजी जामीन अर्जावर सुनावणी पार पडली होती. परंतु न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यानुसार मनीषा मुसळेला जामीन मिळाला आहे. मनीषा मुसळेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका काही दिवसांपूर्वी पोलिसांनी डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या दोषारोपपत्रानुसार मनीषा मुसळेवर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळेच्या विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. मनीषा हीची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते. तेव्हापासून मनीषाने डॉ. शिरीष यांची बदनामी करण्यास सुरुवात केली होती, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार, अधिकार कमी केल्यावर चिडलेल्या मनीषाने डॉ. शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ईमेल पाठवून मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून घेत आत्महत्या करण्याची सुद्धा धमकी दिली होती. याच खोट्या आरोप आणि धमक्यांमुळे व्यथित होऊन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चिठ्ठी लिहीत स्वतःच्या परवानाधारक पिस्टलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. तसेच डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे ह्या भारतीय न्याय संहिता कलम 108 नुसार गुन्हा केला आहे, असा आरोप पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम 18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता डॉ. शिरीष वळसंगकर एस.पी. ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8.30 च्या सुमारास बेडरूममधील बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. दुसऱ्या फायरनंतर कुटुंबीयांनी धावत जाऊन पाहिले असता, डॉ. वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळले. रात्री 9 वाजता त्यांना तात्काळ त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली आणि अन्य पाच तज्ञ डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री 10:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रात्री 10:30 वाजता पोलिस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील करण्यात आली. रात्री 10:45 वाजता फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन बंदूक, काडतूस आणि रक्ताचे नमुने जप्त केले.