
विधानसभेच्या 76 लाख मतांचे गौडबंगाल:मुंबई हायकोर्टाने प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळली; कोर्टाचा दिवस वाया घातल्याचा ठपका
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबईचे रहिवासी असलेले याचिकाकर्ते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर विचार करण्यास न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार दिला. खंडपीठाने म्हटले आहे की याचिकेने न्यायालयाचा वेळ वाया घालवला, परंतु शुल्क आकारले नाही. न्यायालयाने म्हटले, वरील तथ्यांच्या प्रकाशात, आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजे. त्यानुसार ती फेटाळली जात आहे. याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेला. असे असले तरी आम्ही कुठलेही शुल्क लावणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकेत नेमके काय म्हटले होते? विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधील जाहीर झालेले निकाल रद्द करावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयात केली. अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी 6 वाजताच्या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचे अधोरेखित करण्यात आले होते, विशेषतः अंतिम मुदतीनंतर 75 लाखांहून अधिक मते नोंदविण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, त्यांनी 90 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या आणि मोजलेल्या मतांमधील तफावतीकडे लक्ष वेधले. युक्तिवादात काय झाले? निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी असा युक्तिवाद केला की अहिरे यांच्याकडे रिट याचिकेत राज्यव्यापी निकालांना आव्हान देण्याचा अधिकार नव्हता. पुढे, त्यांनी असा युक्तिवाद केला की अहिरे यांनी विजयी उमेदवारांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे, यूनियन ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत याचिकाकर्त्याने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत निवडणूक याचिका दाखल करायला हवी होती. त्याऐवजी, अहिरे यांनी या परवानगी दिलेल्या वेळेच्या बाहेर आणि व्यापक सार्वजनिक परिणाम असूनही, जनहित याचिका म्हणून नियुक्त न करता रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड ऑरस या खटल्याचा निकाल आला आहे. खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. निकाल अपलोड झाल्यानंतर आणि तो कोणत्या कारणांवर फेटाळण्यात आला आहे हे वाचल्यानंतर, मी माझी प्रतिक्रिया देईन. मी उद्या सकाळी 11.30 वाजता व्हीबीएच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेईन. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी म्हटले होते की, निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार जर निवडणुका झाल्या नसतील तर निवडणुकीत गडबड केलेली आहे. आम्ही कोर्टात निवडणूक कशा पद्धतीने झाली आहे, याला आम्ही याचिकेत आव्हान केले. निवडणूक आयोग जर टोकन देऊ शकत नसेल तर 76 लाख मतदान कोणी केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक मतदान संदर्भात आम्हाला रेकॉर्ड दिले जात नसतील तर, निवडणुकीत गडबड केली आहे की नाही हे आता कोर्टाने तपासावे.