
आमदार संग्राम जगतापांची पक्षाच्या बैठकीला दांडी:अजित पवारांनी दिला इशारा, अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करत केले होते वादग्रस्त विधान
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा आहे. त्यात याच पक्षाच्या आमदाराने हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आजच्या बैठकीत मी त्याला बोलेन, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु संग्राम जगताप यांनी पक्षाच्या बैठकीला देखील दांडी मारली असल्याचे समोर आले आहे. अजित पवारांनी संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, आजच्या बैठकीत मी संग्रामला याबाबत बोलेन. आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे, असे पवारांनी म्हटले. परंतु संग्राम जगताप हे बैठकीला देखील उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे अजित पवारांनी त्यांना बोलावून देखील संग्राम जगताप आले नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांच्या मनात नेमके आहे काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशी कृती खपवून घेतली जाणार नाही- अजित पवार अजित पवारांनी संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच अशी कृती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे. मी स्वतः संग्राम जगताप यांच्याशी बोलणार असून अशा प्रकारची वादग्रस्त विधाने का करत असल्याचा जाब विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु, पक्षाच्या नियमित बैठकीला संग्राम जगताप गैरहजर राहिले. वारकऱ्यांच्या सेवेत असल्याने बैठकीला गेलो नाही - संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप हे पक्षाच्या नियमित बैठकीला गैरहजर होते. याबाबत स्पष्टीकरण देताना संग्राम जगताप म्हणाले, आजच्या बैठकीला येणार नसल्याचे मी कळवले होते. सध्या दिंडी सुरू आहेत. वारकऱ्यांच्या सेवेत आम्ही आहोत, त्यामुळे बैठकीला जाता आले नाही, असे स्पष्टीकरण जगताप यांनी दिले आहे. काय म्हणाले होते संग्राम जगताप? हिंदुत्वाचा मुद्दा मांडत अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होत संग्राम जगताप यांनी अक्कलकोट येथे भाषण केले. या भाषणात बोलताना त्यांनी अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केले. ते म्हणाले होते की, औरंगजेबाची पैदाईश भारतीय नव्हती. त्याची वंशावळ परकीय होती. त्यामुळे जो भारतातला आणि महाराष्ट्रातला मुस्लिम धर्मीय आहे, त्याला औरंगजेबाची विचारसरणी मान्य होऊ शकत नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे लोक कधीच भारतीय मुस्लिम होऊ शकत नाही. त्यामुळे याचाही डीएनए टेस्ट करावा लागणार आहे की हा कुठली व्यक्ति आहे, असे म्हणत त्यांनी माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर निशाणा साधला होता. औरंगजेब पवित्र व्यक्ती होते - आसिफ शेख मालेगाव येथील माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेब बद्दल गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले होते, औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्म समभाव ठेवणारे आणि तसेच वागणारे होते. मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हे योग्य नसल्याचे आसिफ शेख म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानावर संग्राम जगताप यांनी पलटवार केला आहे.