
विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम:पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूरला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट तर रायगड व कोकण किनारपट्टी साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उपनगर, दादर, सायन, चेंबूर, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणात दरड कोसळण्याचा धोका पावसाचा जोर कोकणातील घाटमाथा व डोंगराळ भागांमध्ये अधिक जाणवणार असून दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर यांसारख्या ठिकाणी जोरदार पावसामुळे सखल भाग जलमय होऊ शकतात. स्थानिक प्रशासनाने NDRF व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. शिवाय, घाटमाथ्याच्या मार्गावर म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि कोकण रेल्वे मार्गांवर वाहतूक धीमी होण्याची शक्यता आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुट्टी जाहीर करण्याची तयारी काही भागांत सुरू आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काही ठिकाणी जलपातळी धोक्याच्या टप्प्याजवळ पोहोचली आहे. त्यामुळे नदीनिकट भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राज्याच्या इतर भागात म्हणजे पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम असून काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, काही भागांत अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. मुंबईसह कोकण विभागात पुन्हा पावसाचा जोर मुंबईसह कोकण विभागात गेले काही दिवस उघड्या वातावरणानंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात कामकाज, कार्यालयीन हजेरी, रेल्वे वाहतूक, BEST बस सेवा यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने ड्रेनेज सिस्टिम सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने आपत्कालीन पथकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. रेल्वे स्थानकावरही विशेष दक्षता घेण्यात येत असून लोकल सेवा नियमित राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विमानतळावरील उड्डाण सेवांवरही काही वेळ विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.