
दिवा विझल्यावर तेल टाकण्यात अर्थ नाही:ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या स्टेटसची खमंग चर्चा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेणार भेट
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गत काही दिवसांपासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या वेळी त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सॲप वरील स्टेटस मुळे ते खरेच नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. मी नाराज नाही, हे माध्यमांसमोर वारंवार सांगताना भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर 'वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ आहे' असा खोचक सल्ला दिला आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही, असेही ते आपल्या स्टेटसमध्ये म्हणालेत. भास्कर जाधव यांनी दिलेला हा सल्ला उद्धव ठाकरे यांनाच असल्याचे मानले जात आहे. या आधी देखील नाराजीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले होते की, मी आधी गोष्टी करतो. त्यानंतर सांगतो. मी नाराज असल्याच्या चर्चेला अर्थ नाही. पण उद्या नियतीच्या पोटात काय दडलंय हे कुणालाही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. त्यात आताच्या स्टेटस मुळे या चर्चेला दुजोरा तर मिळाला नाही ना? असा प्रश्न पडतो. भास्कर जाधव यांनी तीन दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही. मी माझ्या मनातील व्यथा मांडली. त्यावर कोण काय बोलले त्यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत, त्यावर मी खुलासा करत नाही. मी आधी गोष्टी करतो. त्यानंतर सांगतो. पण नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय, हे कुणालाही सांगता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घेतली जबाबदारी भास्कर जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा केली असल्याचे सांगितले होते. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत आहे. मी ही जबाबदारी केवळ अंगावरच घेऊन थांबणार नाही, तर पक्षालाही यश मिळवून देईन, असा दावा त्यांनी केला होता. आज उद्धव ठाकरे यांची भेट भास्कर जाधव नाराज असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. भास्कर जाधव हे कोकणातच जास्त राहतात. त्यामुळे ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानुसार आज भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ठाकरे भास्कर जाधव यांची समजून कशी काढतात? हे पाहावे लागेल.