
मनसेच्या मोर्चावर आमचा ॲप्रोच निगेटिव्ह नाही:शरद पवारांची स्पष्टोक्ती; 'मराठी'वर ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट चुकीची नसल्याची पुस्ती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका चुकीची नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मनसेने मराठीच्या मुद्यावर मोर्चा काढण्याच्या घोषणेवर आपल्या पक्षाची भूमिका नकारात्मक नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवार 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होणार का? याविषयीची उत्कंठा ताणली गेली आहे. शरद पवारांनी गुरूवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्यावर घेतलेली भूमिका चुकीची नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करू नये असा सर्वांचा आग्रह आहे. इयत्ता पाचवीनंतर हिंदी शिकण्यास काहीही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो. त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडची भाषा समजण्याचे कारण नाही. पण लहान मुले एका विशिष्ट वयामध्येकिती भाषा आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचे ओझे टाकावे लागेल याचाही विचार करावा लागेल. दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे सरकारने इयत्ता पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सोडावा, शरद पवार 6 जुलैच्या मोर्चाला जाणार का? शरद पवार पुढे म्हणाले, ठाकरे बंधू जे बोलतात किंवा त्यांचे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे नाही. त्यांनी कोणत्या स्टेजला हिंदी हवी व कोणत्या स्टेजला नको या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे ते मराठी भाषेवरून एकत्र येण्याची भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली गोष्ट आहे. पत्रकारांनी यावेळी शरद पवारांना राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानुसार तुम्ही 6 जुलैच्या मोर्चाला जाणार का? असा थेट प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, हे तुम्ही मला सांगत आहात. पण मला ते माहिती नाही. कोणताही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. त्यांनी इतर राजकीय पक्षांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. त्यांना बोलू द्या. मग काय तो निर्णय घेऊ. पण आमचा ॲप्रोच निगेटिव्ह नाही. राज ठाकरे यांनी दिली मोर्चाची हाक उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 6 जुलै रोजी सकाळी 10 वा. गिरगाव चौपाटीवरून निघणाऱ्या या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. हा मोर्चा केवळ मराठी माणसांचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल. या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे कळले पाहिजे. गिरगाव चौपाटीवर संपूर्ण महाराष्ट्राची ताकद दिसेल, असे राज ठाकरे यांनी या मोर्चाची हाक देताना म्हटले आहे. हे ही वाचा... मनसेचा 6 जुलैला हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चा:राज ठाकरे यांची घोषणा; पक्षीय राजकारण सोडून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू आक्रमक:6 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे आंदोलन; त्रिभाषा सूत्रही नाकारले मुंबई - हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 6 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर