
डॉ. चैतन्य गोखले यांच्या देवनागरी सुलेखन पुस्तकाचे प्रकाशन:‘शब्दांच्या आंतरिक शक्तीतून छान सुलेखन तयार होत असते’ - अच्युत पालव
शब्दांच्या आंतरिक शक्तीतून छान सुलेखन तयार होतं. त्यामुळे लिहिलेला प्रत्येक शब्द हा फक्त वाचण्यासाठी नसून तो आनंद घेण्यासाठीही असतो. त्यातून एक चित्र साकार व्हायला लागते, असे विचार प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी मांडले. देवनागरी लिपीतील अक्षरलेखनाच्या मूलभूत संकल्पना मांडणारे सुलेखनकार डॉ. चैतन्य गोखले यांचे ‘फंडामेंटल्स ऑफ देवनागरी कॅलीग्राफी’ या सुलेखनावरील पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट्सचे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे, आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स सर्व्हेअर्स असोसिएशनचे (एईएसए) माजी अध्यक्ष आर्किटेक्ट शेखर गरूड तसेच अलोका काळे आणि डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप उपस्थित होते. पालव पुढे म्हणाले की, स्वत:ला व्यक्त करण्यासाठी कॅलीग्राफी किंवा सुलेखनशास्त्र हे कुणीही कोणत्याही वयात शिकू शकते. किंबहुना, कॅलीग्राफी ही एक उपचारपद्धती असून त्यातून व्यक्तीविकासही होतो. डॉ. गोखले म्हणाले की, अक्षरलेखनातील कलात्मक मुल्यांमुळेच त्यातील अभिव्यक्तीमध्ये विविध प्रयोग करता येतात.. त्यामुळे संपर्कासाठी ते आजही एक अत्यंत प्रभावी व विविध अनुभूती देणारे दृश्य व आशयघन माध्यम बनले आहे. त्यातून भावनिक खोलीही निर्माण करता येते. तसेच अक्षरलेखन ही केवळ कला नसून ती अंतर्मुख करणारी प्रक्रिया आहे. डॉ. ढोबळे म्हणाले की, कॅलीग्राफी हा विषय खोल आणि अगाध आहे. त्याचा अभ्यास करणाऱ्याने अक्षरांवर प्रेम केले, तर त्यातला भाव कळेल. डॉ. चैतन्य गोखले यांनी कॅलीग्राफीमधले सौंदर्य या पुस्तकातून दाखवले आहे. कलेची जाण व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्याला भावनिक व बौद्धीक अभिव्यक्तीसाठी त्यांनी कॅलीग्राफीवरील दुसरे नवे पुस्तकही काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. कश्यप म्हणाले की, उच्चारलेल्या शब्दातील अमूर्त भावना मूर्त स्वरूपात व्यक्त करणारे ‘अक्षर’ हे फार मोठे माध्यम आहे. स्वहस्ते केलेल्या सुलेखनामुळे आपणच आपल्या भावनांना दिलेला तो सन्मान असून ते प्रगत संस्कृतीचेही लक्षण आहे. डॉ. गोखले यांच्याकडून भविष्यात कॅलीग्राफीवर नवनिर्मितीची अपेक्षा आहे.