
6 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येणार का?:राज ठाकरे यांचे पुन्हा सूचक विधान; कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचा पुनरुच्चार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांशी संवाद साधण्याचाही निर्णय घेतला आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्याच्या राजकारणात गत काही महिन्यांपासून राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनाची चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी पुढाकार घेत आपल्यासाठी मराठी व महाराष्ट्राहून कोणताही वाद मोठा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आपण आपसातील सर्वच वाद विसरण्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर मनसेच्या काही नेत्यांनी ठाकरे गटाला त्यांनी यापूर्वी दिलेल्या कथित धोक्याची आठवण करून दिली. पण ठाकरे गटाने अत्यंत संयत भूमिका घेत महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असे स्पष्ट करत या प्रकरणी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. उद्धव मनसेच्या मोर्चात सहभागी होणार? त्यानंतर आज राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा करताना पुन्हा एकदा आपल्यासाठी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांशी संवाद साधणार असल्याचेही स्पष्ट केले. विशेषतः राज यांनी आपल्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नसल्याचे प्रामुख्याने अधोरेखित केले आहे. त्यामुळे मनसेच्या 6 जुलैच्या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे एकत्र येणार येणार का? उद्धव ठाकरे मनसेच्या मोर्चात सहभागी होणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. नेमके काय म्हणाले राज ठाकरे? हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. मनसे या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांशी संपर्क साधेल. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले की ते पण (उद्धव ठाकरेंची शिवसेना) आलेच. आम्ही त्यांच्याशीही बोलणार. आमचे माणसे त्यांच्या लोकांशी बोलणार. आमच्यासाठी कोणताही वाद व भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला 6 जुलै रोजी कळेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राचे मराठीपण घालवण्याचा कट आहे. तो या मोर्चाद्वारे सर्वांनी एकत्र येऊन उधळवून लावावा. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. मराठी हा एकमेव अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे. या प्रकरणी सर्वजण विरोध दर्शवत आहेत. त्यामुळे मला राजकीय पक्षांव्यतिरिक्त या मोर्चात कोण सहभागी होणार व कोण सहभागी होणार नाही हे ही पहायचे आहे, असा गर्भित इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला. त्यांनी हे विधान राज्यातील साहित्यिक, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते व इतर सामाजिक संघटनांना उद्देशून केल्याचे मानले जात आहे. हिंदीचे वावडे नाही, पण सक्तीला विरोध - उद्धव ठाकरे दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही हिंदीच्या सक्तीवर आपली भूमिका स्पष्ट करत 7 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आमचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. तो यापुढेही कायम राहील. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी उभी राहिली. आम्हाला हिंदीचे वावडे नाही. पण त्यामागील छुप्या अजेंड्याला विरोध आहे. कालांतराने देशात एकच पक्ष अस्तित्वात राहील, ही सक्ती त्या दिशेने टाकण्यात आलेले एक पाऊल आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जात आहे. त्याचा आम्ही कडाडून विरोध करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. हे ही वाचा... मनसेचा 6 जुलैला हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चा:राज ठाकरे यांची घोषणा; पक्षीय राजकारण सोडून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू आक्रमक:6 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे आंदोलन; त्रिभाषा सूत्रही नाकारले मुंबई - हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 6 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर