
मनसेचा 6 जुलैला हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चा:राज ठाकरे यांची घोषणा; पक्षीय राजकारण सोडून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यात त्रिसुत्री भाषा धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत इयत्ता पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती. पण विरोधकांच्या विरोधामुळे या निर्णयात फेरबदल करत तिसरी भाषा ही पूर्णतः ऐच्छिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण त्यानंतरही विरोधकांच्या टीकेची धार कमी झाली नाही. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर कडाडून हल्ला चढवत मनसे कोणत्याही स्थितीत हिंदीची सक्ती करू देणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी राज यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा सल्ला दिला. पण काहीच फायदा झाला नाही. उलट राज ठाकरे यांनी आपला विरोध अधिक कडवा करत हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. दादा भुसेंची भूमिका फेटाळून लावली दादा भुसेंसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची भूमिका फेटाळून लावली. हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. खरेतर कोणत्याही भाषेची सक्ती करण्याचा निर्णय इयत्ता पाचवीनंतरच यावा. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही सक्तीचा कोणता मुद्दा नाही. त्यांनी हा मुद्दा राज्यांवर सोडले आहे. दादा भुसे यांनीही हे मान्य केले आहे. त्यानंतरही सरकार हिंदीची सक्ती का करत आहे हे अनाकलनीय आहे. 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा बीएसई किंवा तत्सम बोर्डाच्या शाळा ह्या आयएसआय अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढण्यात आल्या होत्या. पण आता त्याच शाळांचे वर्चस्व राज्यांच्या शाळांवर गाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र व आयएसआय अधिकाऱ्यांचा हा अजेंडा आहे. मी शिक्षण मंत्र्यांना यासंबंधी प्रश्न केला. त्यावर ते तेच ते बोलत होते. या संपूर्ण गोष्टीला आमचा विरोध होता, आहे व राहणार. मनसे हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणी 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदीची सक्ती महाराष्ट्राचे मराठीपण घालवण्याचा कट आम्ही यासंबंधी शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक व इतर लोकांशीही चर्चा करणार आहोत. माझे पत्र त्यांना जाणार आहे. 6 जुलै रोजी सकाळी 10 वा. गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी आम्ही मोर्चासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. महाराष्ट्राने या प्रकरणी आपली संपूर्ण ताकद लावावी. या मोर्चात सर्व तज्ज्ञ, पालक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या सरकारला महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे कळले पाहिजे. मी या प्रकरणी इतर राजकीय पक्षांशीही चर्चा करणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राचे मराठीपण घालवण्याचा कट आहे. तो या मोर्चाद्वारे सर्वांनी एकत्र येऊन उधळवून लावावा. इथे कोणताही झेंडा नाही. पण मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे. या प्रकरणी सर्वजण विरोध दर्शवत आहेत. त्यामुळे मला अशावेळी हेही बघायचे आहे की, राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण-कोण या मोर्चात सहभागी होतील व कोण येणार नाहीत, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला. उद्धव ठाकरेंशीही संवाद साधणार राज ठाकरे यांनी यावेळी प्रस्तावित मोर्चासंबंधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशीही संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. आम्ही त्यांच्याशीही बोलणार. आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलणार. कोणताही वाद व भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, असे ते म्हणाले.
हे ही वाचा.... वित्त विभागाचा शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप नाही:मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती; ठाकरेंना टोमण्यांपेक्षा मराठीतील अलंकार वापरण्याचा सल्ला मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्याने महत्वकांक्षी शक्तिपीठ महामार्गावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकारला टोमणे मारण्यापेक्षा मराठी भाषेतील चांगल्या अलंकारांचा वापर करण्याचा उपरोधिक सल्लाही दिला. वाचा सविस्तर