News Image

वित्त विभागाचा शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप नाही:मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती; ठाकरेंना टोमण्यांपेक्षा मराठीतील अलंकार वापरण्याचा सल्ला


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्याने महत्वकांक्षी शक्तिपीठ महामार्गावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकारला टोमणे मारण्यापेक्षा मराठी भाषेतील चांगल्या अलंकारांचा वापर करण्याचा उपरोधिक सल्लाही दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील या खात्याने शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला ब्रेक लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे. ते म्हणाले, वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यांनी ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही. शक्तिपीठाचे केले जोरदार समर्थन ते पुढे म्हणाले, एक महामार्ग बनतो तेव्हा तो अर्थव्यवस्थेची दालने उघडतो. 12 हजार कोटींची गुंतवणूक आपण पायाभूत सुविधांमध्ये करतो तेव्हा त्यातला परतावा 12 हजार कोटींहून कितीतरी कोटी जास्त असतो. तो आपल्या अर्थव्यवस्थेला विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता निर्माण करतो. त्यामुळे जगातले सर्वच देश हे कर्जातून पायाभूत सुविधा निर्माण करतात. कारण, अर्थव्यवस्थेचा नियम आहे की, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतले तर ते उत्तम कर्ज मानले जाते. त्यातून अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते. रोजगार निर्मिती होते. पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. या लोकांनी असाच समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. पण आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले आहे. विशेषतः मराठवाडा व दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे. हा केवळ अॅक्सेस कंट्रोल रोड नाही. या महामार्गावर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर 500 ते 1000 शेततळी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शक्तिपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात, तिथे ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे दुष्काळी भागामध्ये याचे जलसंवर्धन व जलपुनर्भरणासाठी मोठा उपयोग होणार आहे. याशिवाय याचा वापर करून मोठ्या प्रमाणात ग्रिन एनर्जी तयार करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठवाडा व दुष्काळी भागाचे पूर्ण चित्र बदलणारा हा महामार्ग आहे, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंनी टोमण्यांऐवजी मराठीतील अलंकरांचा वापर करावा फडणवीस यांनी यावेळी हिंदीच्या सक्तीवरून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला हाणला. मराठी भाषेत टोमण्यापेक्षा खूप चांगले अलंकार आहे. उद्धव ठाकरे यांनी या अलंकाराचा उपयोग केला तर अधिक चांगले होईल. याहून अधिक मला त्यांना काहीच सांगायचे नाही. कारण, राज्यात हिंदी सक्ती नाही. मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधींना शांत राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी हायकोर्टाने विधानसभा निवडणुकीतील 76 लाखांच्या मतदानाच्या गौडबंगालाविषयी दिलेल्या निकालावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा देशाचे संविधान, लोकशाही व न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचे काम पुराव्यांसह लॉजिकसह न्यायासह व संविधानासह हायकोर्टाने केले आहे. यानंतरही काही लोक झोपेचे सोंग घेऊन झोपल्यासारखे करतील, तर ये पब्लिक है सब जानती हैं. बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे -फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी सर्वसामान्य जनतेविषयी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे असल्याचेही ठणकावून सांगितले. ते म्हणाले, बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी काही निवडक लोकांना उद्देशून हे विधान केले असले तरी असे बोलण्याचा अधिकार कुणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान ज्यावेळी सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे लोणीकर जे काही बोललेत, ते पूर्णतः चुकीचे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. याची समज त्यांना देण्यात येईल. वीजदर कपातीवरही समाधान व्यक्त मुख्यमंत्र्यांनी यावेळी महावितरणने घेतलेल्या वीज दर कपातीच्या निर्णयावरही समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दरवर्षी वीजेचे दर कमी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने, महावितरणने घेतला आहे. आपण मागील 20 वर्षातील इतिहास पाहिला तर साधारणतः दरवर्षी वीजेचे दर 9 ते 10 टक्क्यांनी वाढले. पण आता तेच दर आता कमी केले जात आहेत. उदाहरणार्थ, औद्योगिक दर आज 10 रुपये 88 पैसे एवढा आहे. पुढील 5 वर्षात हा दर वाढण्याऐवजी 9.97 पैशांपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे उद्योगांना पुढील 5 वर्षांत वीज दरवाढीला नव्हे सामोरे जावे लागणार नाही. उलट त्यांचे दर कमी होतील. वीजेचा व्यापारी दर हा 19 रुपये 97 पैसे होता. हा दर 2030 मध्ये 23 रुपये 91 पैशांवर गेला असता. पण आता तो 15 रुपये 87 पैशांपर्यंत घसरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात मोठी दरवाढ ही घरगुती वापरासाठी देण्यात आली आहे. आपले 70 टक्के ग्राहक आहेत, त्यांना 26 टक्के दरवाढ पुढील 5 वर्षांत देत आहोत. आज त्यांचा दर 8 रुपये 14 पैसे आहे. यंदा हा दर 10 टक्क्यांनी कमी होईल. त्यानंतर पुढील 5 वर्षांत 8.14 पैशांवरून 6 रुपयांवर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.