
अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएची निगराणी:मुंबईसह मोठ्या विमानतळांच्या तपासणीमध्ये आढळल्या त्रुटी
अहमदाबादमधील अपघातानंतर हवाई वाहतूक महासंचालनालयाने प्रमुख विमानतळांवर देखरेख वाढवली होती.यात दिल्ली, मुंबईसह अनेक विमानतळांवर विमान वाहतूक प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, असे डीजीसीएने सांगितले. १९ जूनपासून सुरू असलेल्या मोहीमेत रॅम्प, एटीसी कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, सर्व्हिलन्स आणि प्री-फ्लाईट मेडिकल तपासणी यासारख्या क्षेत्रांची चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान अनेक विमानांमध्ये वारंवार एकसारख्या तांत्रिक बिघाडांचे नमुने दिसून आले, यात देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. तसेच बॅगेज ट्रॉली आणि ग्राउंड हँडलिंग उपकरणे निकामी अवस्थेत आढळली. प्रशिक्षणासाठी वापरला जाणारा सिम्युलेटर वापरात असलेल्या विमानांशी सुसंगत नव्हता आणि त्याचा सॉफ्टवेअरही जुने होते तर विमानाचे झिजलेले टायर असल्यामुळे एका उड्डाण थांबवावे लागले. धावपट्टीवरील सेंटरलाइन मार्किंग फिकट अवस्थेत आढळले. गेल्या तीन वर्षांपासून विमानतळांच्या आसपास सुरू असलेल्या बांधकामाचे सर्वेक्षणही झालेले नाही. डीजीसीएने े या सर्व त्रुटी संबंधित एअरलाइन कंपन्या व ऑपरेटरकडे पाठवून ७ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. नवी दिल्ली. इराण-इस्रायलदरम्यान युद्धविराम झाला असला, तरीही भारतासह संपूर्ण जगातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांनी या देशांत जाणाऱ्या किंवा त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक उड्डाणे रद्द किंवा पुढे ढकलली आहेत. यामुळे दिल्ली, मुंबई, कोझिकोड, त्रिवेंद्रम, कोची, हैदराबाद, बंगळुरू, अमृतसर, जयपूर, लखनऊ आणि चंदीगडसह १० पेक्षा अधिक विमानतळांवरील विमानसेवा बाधित झाली आहे. दिल्लीहून ४८ उड्डाणे रद्द करण्यात आली, तर मुंबई व दक्षिण भारतातील विमानतळांसह ही संख्या १०० पेक्षा जास्त आहे. याचा परिणाम १० हजारांहून अधिक प्रवाशांवर झाला आहे. हज समितीने सौदीला जाणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अहमदाबाद विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्सची देशात तपासणी : मंत्री अहमदाबादेतील अपघातग्रस्त विमानाच्या तपासणीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किन्जरापू यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स सध्या भारतात आहे आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो त्याची चौकशी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर केला जाईल. तथापि, एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे — जर क्रॅश-सर्व्हायव्हेबल मेमरी युनिटला गंभीर नुकसान झाले असेल, तर भारतात ‘सीव्हिअर डॅमेज रिकव्हरी’ शक्य आहे का? सध्या भारतात एएआयबी आणि डीजीसीए कडे लेव्हल-१ आणि लेव्हल-२ डिकोडिंग लॅब आहेत. त्यात ही सुविधा नाही.