
सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगलेच:राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया; हिंदी सक्तीलाही विरोध
सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या हिंदी सक्तीला देखील त्यांनी विरोध दर्शवला. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच आहे. मात्र येतील का नाही? हे सांगायला मी ज्योतिषी नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. आणि संजय राऊत एकत्र येण्याचे सांगत आहे. त्यामुळे आणखीन चांगले, असे खोचक उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. कोणी एकत्र येऊन, सर्व विसरून काही करत असतील, तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन भावांमध्ये मतभेद असतील आणि मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे त्यांनी ठरवले तर नाराज होण्याचे काही कारण नाही. असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. काका-पुतण्याच्या प्रश्नावर मात्र, त्यांनी हसून उत्तर देणे टाळले आहे. या वेळी हिंदी सक्तीच्या विरोधाला देखील त्यांनी पाठिंबा दिला. सरकारने पहिली ते चौथी पर्यंत हिंदी सक्तीची करण्याचा आग्रह सोडावा. पाचवीपासून हिंदी शिकवण्यास काहीही हरकत नसल्याचे ते म्हणाले. मात्र, या मुद्यावर राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोण-कोण मोर्चाला येतो, हे मी बघतो, ही भाषा चांगली नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांची कान टोचले आहे. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमध्ये योगदान आहे. क्रिकेट संबंधी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचे मत विचारात घेतले जावे. मात्र हा विषय त्यांचा नाही. त्यामुळे या विषयावर त्याचे मत विचारात घेतलेच पाहिजे, असे काही नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे. देशात 55 टक्के लोक हिंदी बोलतात पहिली ते चौथी प्राथमिक विभाग असतात. हिंदी सक्ती तिथे करणे योग्य नाही. पाचवी ते पुढील वर्गासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हिंदी शिकवणे योग्य असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज देशात 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी कोणतीच भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलणारे नाहीत. म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. मात्र पहिली ते चौथी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणे योग्य नाही. तिथे मातृभाषा ही महत्त्वाची असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही यासंदर्भात मी उद्धव ठाकरे यांचे स्टेटमेंट देखील वाचले आहे. मुंबईला गेल्यावर त्यांचे म्हणणे देखील समजून घेईल. त्यांनी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. इतर राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केला आहे. त्या कार्यक्रमास सहभागी व्हायचे असेल तर नक्की धोरण काय? हे समजून घ्यावे लागेल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणीही सांगतो आणि त्याच्या मोर्चात सहभागी होणार, असे होणार नाही. त्यांची भूमिका समजून घ्यावी लागेल. जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल तर नक्कीच मोर्चा सहभागी होणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काल दिलेल्या आव्हानच्या प्रश्नावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.