News Image

देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली:आता आमचे काय होणार? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याला शरद पवारांचा खोचक टोला


महाराष्ट्रातील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग. परंतु या महामार्गाला कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या भूसंसंपादनाच्या दृष्टीने 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पात राजकारण आणाल तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. यावर शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात राजकारण आणाल तर याद राखा, असा इशारा विरोधकांना दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, आता आमचे कसे होणार? असा खोचक टोला लगावला आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलत आहेत त्यांची मते आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तिपीठ हे उत्तर - मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलताना म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तिपीठ हे उत्तर असणार आहे. तो एक ॲक्सेस कंट्रोल रोड नसेल, तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही 100 शेततळी बांधणार आहोत. तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल. त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल.