News Image

आता दुचाकींनाही भरावा लागणार टोल?:पायी चालणाऱ्यांकडूनही घ्या, रोहित पवारांचा टोला; नितीन गडकरींनी दिले स्पष्टीकरण


आता महामार्गांवरून प्रवास करताना दुचाकींनाही टोल भरावा लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. 15 जुलैपासून देशभरात दुचाकीस्वारांकडून टोल वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती विविध माध्यमातून समोर येत आहेत. परंतु, यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत टीका केली आहे. रोहित पवारांनी ट्विट करत लिहिले की, 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना देखील टोल लागू करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. असे असेल तर सरकारने आता पायी चालणाऱ्यांकडून देखील टोल घ्यायला हवा, किंबहुना या मार्गावरून उडणाऱ्या पक्षांनाही टोलच्या कक्षेत कसे आणता येईल यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी, जेणेकरून शासकीय तिजोरी वेगाने भरेल! असे म्हणत खोचक टीका केली आहे. दुचाकीलाही टोल लागणार अशी चर्चा सुरू असून याला खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णविराम दिला आहे. सध्या दुचाकी वाहनांवर कोणताही टोल आकारला जात नाही, आणि भविष्यातही टोल लावण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत माहिती दिली की, काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो, अशा स्पष्ट शब्दांत नितीन गडकरी यांनी खडसावले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर वापरकर्ता शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. न्हाई (NHAI) स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही.