News Image

शनिवारवाडा-स्वारगेट भुयारी मार्गाला गडकरींचा पाठिंबा:2.5 किमी लांबीच्या चौपदरी मार्गासाठी लवकरच विभागीय अधिकाऱ्यांची बैठक


पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले असता काकासाहेब गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रासने यांनी निवेदन देत प्रकल्प उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील मध्यवर्ती आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे मार्ग असून, दररोज लाखो वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असते. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे दोन्ही रस्ते दक्षिणोत्तर मार्गाचा महत्वाचा दुवा असून भविष्यात ‘लिंक कोरिडॉर’ म्हणून उपयोग होण्याची क्षमता बाळगतात. या पार्श्वभूमीवर ‘भुयारी चौपदरी मार्ग’ हा पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक वारसा जपणूक आणि वाहतूक सुलभीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असून, निधीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, "शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या शहराच्या मध्यवर्ती मार्गांवर कायम वाहतूक कोंडी जाणवत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे 2.5 किमी लांबीचा, चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण सहकार्य मिळत असून केंद्र शासनाच्या सहकार्याने देखील हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी मा. नितीन गडकरी यांना निवेदन देत निधीची विनंती केली आहे. हा भुयारी मार्ग माझं स्वप्न असून तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर विशेष मदत मिळावी, अशी विनंतीही आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केली.