News Image

चांदीपुरा व्हायरसवर उपचार शोधला:60 वर्षांपासून प्राणघातक ठरणाऱ्या विषाणूवर फेविपिरावीर औषध प्रभावी


भारताच्या ग्रामीण भागात गेल्या 60 वर्षांपासून उच्छाद मांडणाऱ्या चांदीपुरा विषाणुवर अखेर उपचार सापडला आहे. चांदीपुरा व्हायरस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजारामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात आतापर्यंत शेकडो मुलांचा मृत्यू झालाय. भारतीय शास्त्रज्ञांनी चांदीपुरा विषाणूसाठी एक औषध शोधले आहे. ज्याद्वारे रुग्णाच्या जीवाला धोका कमी करता येतो. चांदीपुरा विषाणू हा एक रॅबडोव्हायरस आहे, जो पहिल्यांदा 1965 मध्ये महाराष्ट्रातील चांदीपुरा गावात सापडला होता. म्हणूनच त्याचे नाव चांदीपुरा ठेवण्यात आले. हा विषाणू वाळू माशीच्या चाव्याव्दारे पसरतो आणि मुलांमध्ये एन्सेफलायटीस होतो जो मेंदूवर वेगाने परिणाम करतो. याला सामान्यांच्या भाषेत मेंदू ताप म्हणतात. हा आजार 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना सर्वात जास्त लक्ष्य करतो. चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाला ताप, उलट्या, बेशुद्धी यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा प्रादुर्भाव झालेला रुग्ण 24 ते 48 तासांच्या आत मरतो.नवी दिल्ली येथील इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा विषाणू गेल्या अनेक वर्षांपासून भारतात 'सायलेंट किलर' राहिला आहे. त्याविरुद्ध संभाव्य अँटीव्हायरल उपचारांचा शोध पूर्ण झाला आहे. पुणे येथील आयसीएमआरच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) त्यांच्या पेशी आणि प्राण्यांच्या मॉडेल प्रयोगांमध्ये या प्राणघातक विषाणूची वाढ थांबवण्यास सक्षम असलेले फेविपिरावीर नावाचे औषध शोधले आहे. भारतात या प्राणघातक विषाणूसाठी औषधाची प्रभावीता वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2024 मध्ये, गुजरातमध्ये चांदीपूर विषाणूचा गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठा प्रादुर्भाव नोंदवला गेला होता. जून ते ऑगस्ट 2024 या काळात गुजरातसह अनेक विविध राज्यांमध्ये चांदीपुरात व्हायरसमुळे 82 जणांचा मृत्यू झाला होता. तर 245 हून अधिक लोक बाधित झाले. आता फेविपिरावीर या औषधाच्या मानवी चाचण्या लवकरच सुरू करता येतील असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आंध्रप्रदेशात 2003 ते 2004 दरम्यान, या व्हारसच्या प्रादुर्भावामुळे 329 लोक बाधित झाले होते. त्यापैकी 183 लोकांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात 114 आणि गुजरातमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. तर 2004 ते 2011 दरम्यान गुजरातमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जणांना याचा फटका बसला. त्याचप्रमाणे 2009 ते 2011 दरम्यान इतर राज्यांमध्ये 16 जण चांदीपुरा व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले होते.