
इंदिरा गांधींनी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला:संविधान हत्या दिवस कार्यक्रमात फडणवीस म्हणाले- 50 वर्षांपूर्वी PM पदाला न्यायालय कक्षेतून काढले होते बाहेर
या देशात पन्नास वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केवळ आणीबाणी लागू करून विरोधातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले नव्हते तर तर भारतीय संविधानात देखील बदल केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील मुलभूत अधिकार माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते. मात्र तेच अधिकार इंदिरा गांधी यांनी संपवले होते. त्या जागेवर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला जागा देण्यात आली होती. पंतप्रधान याच्या पदाला कोणत्याही न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले होते, असा दावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 'संविधान हत्या दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला अमर्याद अधिकार दिले होते. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाला देखील संसदेच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न संविधानाला बदलून करण्यात आला होता. भारतीय लोकशाहीला संपवण्याचे काम 50 वर्षांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केले होते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारताच्या लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही संग्राम सेनानी लढले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी मिळून अशी लढाई लढली की, ज्यामुळे भारताचे संविधान आणि भारताची लोकशाही वाचली. त्यामुळे हा दिवस देशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या पुढच्या पिढीला भारताची लोकशाही आम्ही वाचवली, हे सांगावे लागणार आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नेत्यांनीच संविधानाची हत्या केल्याने विरोधक बोलत नाहीत - फडणवीस संविधान हत्या दिवसांवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी आणीबाणी मान्य होती का? हे सांगावे. विरोधक कशावरही टीका करू शकतात. भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही विरोधकांना मान्य होती का? त्याच्यावर विरोधक बोलत नाही. कारण त्यांच्या नेत्यांनीच ही हत्या केली होती, हे त्यांना माहिती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अक्षरशः बदलण्याचे काम त्यांच्याच नेत्यांनी केले होते. त्यामुळे विरोधक त्या विषयावर बोलू शकत नाही. म्हणून इतर गोष्टींवर बोलत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आणीबाणी : लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय - फडणवीसांचा विशेष लेख जेव्हा काँग्रेस सरकारने आपल्या विरोधात चिघळणार्या राजकीय वातावरणावर आणीबाणीची शाल पांघरण्याचा प्रयत्न केला, अचानक एके रात्री देश झोपेत असताना लोकशाहीची हत्या केली. लोकशाही मूल्यांचा आणि सांविधानिक संस्थांच्या त्या भीषण संहाराचा आढावा घेणारा, लोकशाहीच्या रक्षणार्थ आणीबाणीविरोधात झुंजणाऱ्या सेनानींच्या गौरवाचे महत्व अधोरेखित करणारा माझा विशेष लेख... नक्की वाचा, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेला लेख वाचण्याचे आवाहन केले आहे. अत्याचारांची आणि संवैधानिक मूल्यांच्या उल्लंघनाची जाणीव भारतीय जनता पक्षाने आज आणीबाणीचा 50 वा वर्धापन दिन 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्याला 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लादलेल्या आणीबाणीची आठवण करून देतो, ज्याला भाजप भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय मानते. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा उद्देश नवीन पिढीला आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांची आणि संवैधानिक मूल्यांच्या उल्लंघनाची जाणीव करून देणे आहे.