
महाराष्ट्रातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू:नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज
मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असून आज राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 2025 मध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात अवकाळी नंतर हा मान्सून सक्रीय आणि गतिमान राहिला आहे. गत वर्षीपेक्षा 26% जास्त पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी उंच लाटा आदळण्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, अमरावती आणि नागपूर परिसरातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला असून, निचऱ्याच्या भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना छत्रीचा वापर करावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा 30-40% अधिक पाऊस पडला आहे. तसेच या भागासाठी हवामान विभागाने आधीच ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तसेच या भागात दरड कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे. विभागातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर आणि परिसर सांताक्रुझ वर ४२५.२मिमी, कुलाबा ४७७.८मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरीच्या 80% पाऊस झाला आहे. तसेच मुंबई आणि परिसरात आज देखील ढगाळ वातावरण असून थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभगाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. तसेच समुद्रातील 4.5-4.8 मीटर दरम्यान लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनारी चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. पुणे व कोकण घाट ताम्हिनी घाटात 370 मिमी, लोणावळ्यात 205 मिमी, इतर भागात 80–150मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुण्याजवळील खडकवासला धरणात 70% पाणीसाठा आहे. पुण्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण घाटात जोरदार भरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागने यलो अलर्ट जारी केल आहे. प्रमुख धरणातून सध्या विसर्ग सुरू महाराष्ट्रातील काही प्रमुख धरणातून सध्या विसर्ग सुरू आहे, विशेषतः पुणे, नाशिक, आणि सोलापूर विभागांतील धरणांमुळे विसर्ग करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख उजनी, खडकवासला, गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वर आणि इतर मध्य-महाराष्ट्रातील धरणांमधून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे. यामुळे पुणे–मुठा नदी परिसर, नाशिकमधील नदीकाठ व ग्रामीण भाग, तसेच सोलापूर–पंढरपूर मार्ग, या क्षेत्रांत सतर्कता आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने बचाव तथा आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्जता ठेवली आहे. नागरिकांनी प्रशासनिक सूचना पाळून सतर्क राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.