
हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको:तारा भवाळकर यांची कणखर भूमिका; अरविंद जगताप म्हणाले- सक्तीच्या भक्तीने देवाची बदनामी!
हिंदीच काय पहिलापासून इंग्रजीही नको. विद्यार्थ्यांना चौथीपर्यंत फक्त मातृभाषेतच शिक्षण द्या. जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयात शिकवल्या जात नाहीत. मुलांना पाचवीपासून दुसरी भाषा आणि आठवीपासून तिसरी भाषा शिकवा. हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे, अशी कणखर भूमिका साहित्य संमेलनाध्यक्ष आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत?:एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून हिंदीची सक्ती करू नका, अभिनेते सयाजी शिंदेंनी सरकारला सुनावले सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. 'सक्तीची भक्ती काही कामाची नसते. त्याने उलट देवाचे बदनामी होते. आपण कितीतरी हिंदी लेखकांचे फॅन आहोत. पण ते आपलं प्रेम आहे. ती सक्ती नाही,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मातृभाषेत पाया पक्का व्हावा महाराष्ट्रात 5+3+3+4 या मॉडेलनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले जात आहे. त्यासाठी 1 ली ते 5 वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला विरोध झाल्यावर सरकारने मराठी सक्तीची असेल, इंग्रजी ही दुसरी भाषा असेल आणि तिसरी भाषा ऐच्छिक असल्याचे सांगितले. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती नाही. इतर कोणतीही तिसरी भाषा येते. पण ही भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. तरच त्यांना शिक्षक मिळेल. अन्यथा त्या विद्यार्थ्याने निवडलेली भाषा ही ऑनलाइन शिकवली जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदीची सक्ती केली जातेय, असा आरोप होतोय. सरकारच्या या धोरणाला लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी कडाडून विरोध केला. त्या म्हणाल्या की, 'मी स्वतः गेले 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. स्वतः जागरुक नागरिक आणि शिक्षिका आहे. सर्व भाषाविषय सर्व स्तरावर शिकवले आहेत. मी स्वतः अनुभवाने सांगते, इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेव्यतिरिक्त कोणतीही भाषा शिकवली जाऊ नये. विद्यार्थ्यांचा मातृभाषेत पाया पक्का होऊ द्यावा.' अन्याकारक आणि अशैक्षणिक डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, 'मूल सहा वर्षांचे असताना शाळेमध्ये येते. ते अतिशय लहान असते. त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धीक क्षमता लक्षात घेतल्या जाव्यात. अर्थात बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं. सगळे विषय, शाळा ही त्या मुलाला नवीन असतात. अशा वेळेला त्याच्यावर अन्य भाषा लादणे हे अन्यायकारक आहे. अशैक्षणिक आहे. इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते. तिही त्या मुलावर अन्यायकारक आहे. कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली, तर त्याला धड मातृभाषाही येत नाही. परकीय भाषाही येत नाही. मुलाला चौथीपर्यंत मातृभाषेत शिक्षण दिले. त्याचा भाषेचा पाया पक्का झाला. मग कुठलिही भाषा आकलन करणे सोपे जाते. जुनी पद्धत रास्त डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की 'विरोध कुठल्याही भाषेला नसून, ती भाषा पहिलीपासून लादण्याला आहे. एक शिक्षक म्हणून विरोध आहे. एक नागरिक म्हणून विरोध आहे. त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं ते ही योग्य नाही. आणि तिसरी भाषा तर त्याच्यावर आणखी अन्यायकारक होऊ शकेल. जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयात शिकवल्या जात नाहीत. त्यानंतरच्या काळामध्ये पाचवीपासून दुसरी भाषा आणि आठवीपासून तिसरी भाषा ही मुलाला शिकवली जावी. ती पद्धत आजपर्यंत होती आणि ती रास्त होती. असं माझं प्रामाणिक मत आहे. ते संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मी सांगते आहे.' मादराना जजबा गालिब झालाय... सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हिंदीला विरोध केला. ते म्हणाले की, 'मराठवाड्यातले थोर इतिहास संशोधक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ब्रह्मानंद देशपांडे भन्नाट माणूस होते. भाषेबद्दल बऱ्याच गमती सांगायचे. त्यांच्या शिक्षणाच्या काळात म्हणजे निजाम काळात मराठवाड्यात ऊर्दू शिक्षण होतं. सक्तीचं होतं. त्या भाषेचा नको तो प्रभाव सांगताना ते एक किस्सा सांगायचे. '' मराठवाड्यात एक गृहस्थ मला म्हणाले, 'पहा कसा कुदरती नजारा आहे.' आता हे स्वर्गीय दृश्य कुठे म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो तर ते म्हणाले, 'ती कुत्री जनलीय. पिल्लांना चाटायलीय. कसा मादराना जजबा गालिब झालाय तिच्यावर!' (मादराना जजबा= मातृत्वाची भावना, गालिब होणे=प्रभावी होणे)'' प्रेम आणि सक्ती अरविंद जगताप पुढे म्हणतात की, 'आज विश्वास बसणार नाही पण असं बोलायचे लोक. सक्ती. हिंदू, ऊर्दू किंवा कुठल्याही भाषेचं स्वतःचं सौंदर्य असतं. प्रेमचंड, साहिर, विनोदकुमार शुक्ल, गुलजार, जावेद अख्तर अशा कितीतरी लेखकांचे आपण फॅन आहोत. पण ते आपलं प्रेम आहे. ती सक्ती नाही. ता. क. - सक्तीची भक्ती कामाची नसते. त्याने उलट देवाची बदनामी होते. मग...' पक्ष फोडायचा, आमदार गोळा करायचे... अरविंद जगताप यांनी यापूर्वीही सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारच्या धोरणावर अगदी शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यात ते म्हणाले होते की, 'पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.' कवी दिवटेंची पुरस्कार वापसी महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याला विरोध करत कवी हेमंत दिवटे यांनी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करून केलीय. त्यात ते म्हणतात की, 'हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया ह्या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करीत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन.' दिवटे यांच्या या निर्णयाची मराठीतील अनेक कवी, साहित्यिक, समीक्षकांना पाठराखण केली आहे. तसेच हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. गोस्वामींनीही केला विरोध सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, शासनाच्या पहिलीपासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य (जरी तिची अनिवार्यता काढून कुठलीही भाषा, पण २० विद्यार्थी जमले तरच असा विचित्र पर्याय देऊन शब्दछल केला असल्याने) करण्याला विरोध आहे..हिंदी भाषा शिकण्याला नाही . मुलं थोडी मोठी झाली की ५ वी नंतर शिकवा की हिंदी..आमचा विरोध प्राथमिक शिक्षणात समावेशाला आहे..सरसकट हिंदी भाषेला नाही. कोवळ्या वयात मुलांना मराठी लिपी, व्याकरण याचा अदमास यायला पुरेसा वेळ मिळावा. मातृ भाषेचा पाया घट्ट व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे..त्याच वेळी इंग्रजी,आणि त्यावर हिंदी अशा भाषांचे ओझे का द्यायचे? राजकीय नव्हे हा सामाजिक प्रश्न सचिन गोस्वामी पुढे म्हणतात की, मराठी आणि हिंदी लिपी (देवनागरी) सारखी असली, तरी व्याकरण चिन्हे व काही उच्चार वेगळे आहेत. एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेतील फरक मुलाना गोंधळात पाडू शकेल. इयत्ता म्हणायची की कक्षा? शिक्षा म्हणजे दंड की शिक्षण? विमान की हवाई जहाज...ससा की खरगोश...धनुष्य की धनुष...असे असंख्य गोंधळ लहान वयात निर्माण होण्याऐवजी एका भाषेची सवय होऊ द्या. मग नवी भाषा आत्मसात लवकर होईल एव्हडच…उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदीला विरोध असा बालिश तर्क काढून याला राजकीय स्वरूप देऊ नका..हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय नाही.