News Image

कुछ तो गडबड है?:उदय सामंत अजित पवारांच्या तर अजित पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले; निधी वाटपावरून नाराजी नाट्याची चर्चा


राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले असले तरी सत्ता स्थापनेपासूनच तिन्ही पक्षातील मतभेद वारंवार समोर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये असलेली नाराजी समोर आलेली असतानाच आता निधी वाटपावरून देखील शिंदेंचे मंत्री नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री उदय सामंत हे अजित पवारांच्या भेटीला तर त्यानंतर स्वतः अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. या सर्व घटनांमुळे आता महा-युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात महा-युतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शपथविधी आणि त्यानंतर मंत्रालयाच्या वाटपासाठी देखील दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. पालकमंत्री पदाचा तिढा तर अद्याप देखील सुटलेला नाही. त्यातच आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपली नाराज व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत हे अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. तर त्यानंतर लगेचच अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. या सर्व घटना घडामोडीमुळे महा-युतीत किंवा राज्य सरकार मध्ये नेमके चालले काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तोडगा काढण्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर निधी वाटपाबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यापर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवणे आणि त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निधी वाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता उदय सामंत यांच्या शिष्टाचाराने महायुतीतील संबंध राखण्यास कशी मदत होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा - एकनाथ शिंदे यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना अजित पवार यांच्या निधी वाटपावर वॉच ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. अजित पवार कोणत्या मंत्रालयाला, कोणत्या विभागाला किती निधी देतात? यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निधी वाटपावर शिवसेना नेते आणि मंत्र्यांचे बारीक लक्ष असणार आहे. वॉच ठेवायचा त्यांनी जरूर ठेवावा, त्यांना तो अधिकार - अजित पवार दुसरीकडे या संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, ज्याला माझ्या निधी वाटपावर वॉच ठेवायचा त्यांनी जरूर ठेवावा. त्यांना तो अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला टोलावून लावले आहे.