
तुझ्या अंगावरचे कपडे आमचे, बापाला पेरणीला दिलेले पैसेही आमचे:भाजपच्या बबनराव लोणीकरांचे विधान; सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला समाचार
नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर राज्यभरातील नेत्यांनी टीका केली आहे. इतकेच नाही तर आता लोणीकर यांना राज्यात फिरु देणार नसल्याचा इशारा देखील काँग्रेसने दिला आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांनी देखील लोणीकरांचा समाचार घेतला आहे. मानसिक-वैचारिक दिवाळखोरी आणि नीतिमत्तेचा अभाव - हर्षवर्धन सपकाळ "मानसिक दिवाळखोरी, वैचारिक दिवाळखोरी आणि नीतिमत्तेचा अभाव या साऱ्यांचे प्रतिबिंब लोणीकर यांच्या एकंदर वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर लोणीकर यांना महाराष्ट्रात फिरु देणार नसल्याचा इशारा देखील काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. लोणीकर महाराष्ट्रातील नागरिकांना लाचार समजतात - संजय राऊत बबनराव लोणीकर यांच्यासारखे लोक भाजपमध्ये आहेत. हे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवे. ते लोक महाराष्ट्रातील नागरिकांना लाचार समजतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. जनता स्वाभिमानी आहे, लाचार नाही, हे लोणीकरांना समजले नाही. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी - विजय वडेट्टीवार ' शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात' ! भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी! सरकारी योजना या भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिल्यागत सांगणं ही महाराष्ट्रातील जनतेची थट्टा आहे. हे पैसे जनतेचे आहेत, त्यात महायुतीच्या मंत्र्यांच कर्तृत्व म्हणजे धनादेश वाटताना फोटो काढून घेणं! सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा तुम्ही आज सत्तेत आहात ते शेतकरी आणि जनतेच्या मतांमुळे, आणि तोच शेतकरी गरज पडल्यास तुमचं मूल्यही शून्यावर आणू शकतो! बच्चू कडू यांनी घेतला खरपूस समाचार 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी अतिशय शेलक्या शब्दांत बबनराव लोणीकर यांचा समाचार घेतला आहे. ते आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात, 'आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो, अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तू व तुझा बाप पण निवडून येतो. अन आमचा बाप काढतो. तुझा बाप असेल मोदी जगाचा बाप शेतकरी आहे.' यांचे बोल मतदारांनी लक्षात ठेवावे - अंबादास दानवे या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील लोणीकर यांच्यावर टीका केली आहे. तुमचे कपडे, बूट, विधानसभेतील स्थान देखील जनतेमुळे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर निवडणूक येत आहेत, त्यामुळे यांचे हे बोल मतदारांनी लक्ष्यात ठेवावे, असे आवाहनही दानवे यांनी केले आहे. दानवेंची पोस्ट पहा....
ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण..
तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे..
आमदारकी जनतेमुळे..
तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..
तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..
नेतेगिरी जनतेमुळे..
विधानसभेतील स्थान जनतेमुळे..
यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे! पाठीचा कणा हरवलेले लोणीकरांसारखे कळपाने सापडतील - सुषमा अंधारे बबनराव हे वागणं बरं नव्हं.. तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा. जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे. जनता कष्टाने कमवून खाते तुम्ही भ्रष्टाचार करून खाता. सत्ताधाऱ्यांना कुर्निसात करताना खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चाललीय. पाठीचा कणा हरवलेले लोणीकरांसारखे कळपाने सापडतील. नेमके काय म्हणाले होते लोणीकर कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात. या कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन मीच दिले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेत लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या. पाच वर्षांचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच-दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका, असा टोला त्यांनी गावकऱ्यांना लगावला. तसेच, मी एक, दोन, तीन वेळा पाहिलं, त्यानंतर गावावर फुली मारील, असा थेट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. खाली पाहा व्हिडिओ