
अजित पवारांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करावा:राऊत यांची मागणी; भास्कर जाधवांनाही ठाकरेंना भेटण्याचा सल्ला
शक्तिपीठ महामार्गाला वीस हजार कोटी रुपये मंजूर केले गेले आहेत. यातील दहा हजार कोटी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वळवले जातील. त्यामुळे आता अजित पवार यांनी अशा योजनेला विरोध करायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या योजनेमुळे राज्याचा तिजोरीवर ताण येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावरुन राऊत यांनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. या वेळी राऊत यांनी शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध केला. अशा योजनांमध्ये किमान 50% दलाली ही सरकारच्या लोकांकडे येत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. या ठेकेदारांकडून आधीच उचल घेतलेली आहे. यातील ठेकेदारांना आधीच कामाचे शब्द दिलेले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. हाच पैसा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वापरला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांना ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, या महाराष्ट्रातून अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रासह मुंबईतील सर्व योजना अदानी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत. यात अगदी वीज वितरण पासून वीज कलेक्शन पर्यंत गुजराती व्यापाऱ्यांना दिला जातोय. महाराष्ट्रात कोणी नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अदानीला हाकलून देणे हाच महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणे थांबवावे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली, त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. त्याविषयी एकनाथ शिंदे काही बोलत असतील तर त्या वेळी ते गोधडीत रांगत होते. मुळात एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणे थांबवावे, अशी मागणी राऊत यांनी केली. शिंदेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाचा जप करावा. या देशाला शिस्त लावण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आणीबाणी मध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाला देखील बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. असा दावा राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना काही माहीत नाही ते बरळत असल्याचे राऊत म्हणाले. त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा क्लास घ्यायला मी स्वतः तयार आहे. काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे, तो एकनाथ शिंदे यांनी वाचावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.